‘आई मला माफ कर, मला ब्लॅकमेल करतायत’; बारामतीत २३ वर्षीय युवकाची आत्महत्या, पुण्यातील दोन बहिणींवर गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
बारामती : प्रेमसंबंधातून होत असलेल्या कथित मानसिक त्रासाला कंटाळून २३ वर्षीय तरुणाने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यात घडली. रुई बयाजीनगर येथील विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय २३) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाणे येथे पुण्यातील दोन बहिणींसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रमच्या मामा सत्यवान आप्पा इंगळे (रा. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सृष्टी विकास मते, श्रुती विकास मते आणि विकास मते (सर्व रा. खडकवासला, पुणे) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, विक्रम आणि सृष्टी यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुरुवातीला लग्नाचे आश्वासन देण्यात आले; मात्र नंतर घरच्यांचा विरोध असल्याचे सांगत लग्नास नकार देण्यात आला, असा आरोप आहे. २७ डिसेंबर २०२५ पासून सृष्टी व तिची बहीण श्रुती यांनी वारंवार फोन करून मानसिक त्रास देणे व ब्लॅकमेल करणे सुरू केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
तसेच, विक्रमला पुण्यात बोलावून त्याच्या मोबाईलमधील फोटो व चॅटिंग जबरदस्तीने डिलीट करण्यात आल्याचा, जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आणि सृष्टीचे वडील विकास मते यांनी नातेवाईकांना दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ७.४५ वाजण्याच्या सुमारास विक्रमने घरातील किचनमध्ये गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत, “आई मला माफ कर. मला ब्लॅकमेल करून खूप मानसिक त्रास दिला जात आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे,” असा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. या चिठ्ठीत संबंधित व्यक्तींनी दिलेल्या त्रासाचा संदर्भ असल्याचेही समोर आले आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल आनंद कदम करत आहेत.