कल्याण–डोंबिवलीत दामिनी पथकाची विशेष मोहीम; १,०१३ प्रकरणांत कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : महिला सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ ३ (कल्याण) येथील दामिनी पथकाने जानेवारी २०२६ पासून विशेष सुरक्षा मोहीम राबवली असून, या कालावधीत एकूण १,०१३ प्रकरणांत कारवाई करण्यात आली आहे. व्हॅलेंटाईन दिनाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली होती.
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण व डोंबिवली शहरातील गर्दीची ठिकाणे, मॉल्स, उद्याने, बागा, निर्जन परिसर तसेच शाळा व महाविद्यालयांच्या आजूबाजूच्या भागांत ही कारवाई करण्यात आली. शाळकरी विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरुणी आणि नोकरीस जाणाऱ्या महिलांची छेडछाड, सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे, व्यसन, आरडाओरड करून शांतता भंग करणे अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यावर भर देण्यात आला.
दामिनी पथकाने मपोका कलम ११०, मपोका कलम ११२ व ११७, कोप्ता कलम ४ व २१ अंतर्गत तसेच इतर प्रतिबंधात्मक कायद्यांनुसार कारवाई केली. या मोहिमेमुळे शाळा-महाविद्यालय परिसरात सुरक्षिततेची भावना वाढल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे.
दरम्यान, परिमंडळ ३ अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक व नागरिकांना पोलिसांनी आवाहन केले आहे की, महिलांशी संबंधित कोणतीही संशयास्पद अथवा त्रासदायक घटना आढळल्यास तात्काळ ‘डायल ११२’ वर संपर्क साधावा. महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची अशीच कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.