वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट परिसरात कारवाई; दोन विधीसंघर्षित बालकांकडून गावठी पिस्तूल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मांजरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मांजरी पोलीस ठाणे हद्दीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट परिसरात सापळा रचून पोलिसांनी दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे संबंधित परिसरात सापळा रचण्यात आला. संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान त्यांच्याकडे बेकायदेशीररीत्या बाळगण्यात आलेले गावठी पिस्तूल आढळून आले. या प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, शहरातील बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर पोलिसांचा कडक अंकुश कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.