कर्जफेडीसाठी चुलत भावाच्या घरातच चोरी; मुंढव्यातील आरोपी अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : कर्जाचे पैसे फेडण्यासाठी चुलत भावाच्याच घरात चोरी करणाऱ्या नातेवाईकाला मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात तब्बल २२ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, मुंढवा पोलीस स्टेशनच्या तत्पर कारवाईचे कौतुक होत आहे.
मुंढवा परिसरातील सर्वे नंबर ९४/बी येथील एका घरातून ३७९ ग्रॅम सोन्याचे दागिने, सुमारे एक किलो चांदी आणि दोन लाख रुपये रोख असा एकूण २२,११,००० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. तपासादरम्यान ही चोरी घरातीलच एका नातेवाईकाने केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात आशुतोष अशोक कासवा (वय ३८) याला अटक करण्यात आली असून तो फिर्यादीचा चुलत भाऊ असल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच स्थानिक बातमीदार व गुप्त माहितीच्या आधारे संशयितावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
तांत्रिक आणि गोपनीय तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. चौकशीत त्याने कर्जफेडीसाठी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
मुंढवा पोलिसांच्या या जलद व प्रभावी कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पोलीस दलाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.