छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आणि दामिनी पथकाच्या धाडीमुळे बालविवाह रोखण्यात पोलिसांना मोठं यश
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – काही बोलावं, कसं सांगावं? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विवाह केला जात होता. पोलिसांनी वेळीच हे लग्न रोखल्याने मुलीचं आयुष्य सुधारलं आहे. पण हे लग्न करण्यामागे मुलीच्या आईने तिच्या सुरक्षेचं कारण सांगितलं आहे. आपण धुणी-भांडी करायला जातो. घरी कुणी पुरुष नाही. आपण कामावर गेल्यावर मुलगी घरी एकटी कशी राहणार? अशा विचारातून आपण मुलीचं लग्न लावत असल्याचं महिलेने म्हटलं. पण पोलीस आणि दामिनी पथकाने अल्पवयीन मुलीचं लवकर लग्न केल्याने तिच्या आयुष्यावर किती वाईट परिणाम होणार, याबाबत माहिती दिली. पोलीस आणि दामिनी पथकाच्या धाडीमुळे बालविवाह रोखण्यात आला.
बीड बायपास रोडवरील शुभम लॉन्स येथे गुरुवारी एका विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. मंडप सजला होता, पाहुण्यांची लगबग सुरू होती आणि नवरी मुलगी लग्नासाठी नटून-थटून तयार होती. तिचा मेकअप सुरू असतानाच, महिला व बालविकास समितीच्या सदस्य आम्रपाली बोर्डे यांना या विवाहाबद्दल खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी तातडीने दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक कांचन मिरधे यांना पाचारण केले.
कांचन मिरधे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल निर्मला निंभोरे, कविता गवळी, मोनिका दिवे, सुनिता नागलोद आणि बीट मार्शलचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नवरी मुलीचे आधार कार्ड तपासले असता सर्वांनाच धक्का बसला. नवरी मुलगी केवळ १७ वर्ष ६ महिन्यांची असल्याचे निष्पन्न झाले. अवघ्या सहा महिन्यांनंतर ती सज्ञान होणार होती, मात्र त्याआधीच तिच्यावर संसाराचं ओझं टाकलं जात होतं.
मुलीच्या आईने आपली भूमिका मांडताना सांगितले की, त्या मुंबईत धुणी-भांडी करून उदरनिर्वाह करतात. घरात पुरुष माणूस नसल्याने आणि कामाच्या निमित्ताने घराबाहेर राहावे लागत असल्याने, मुंबईसारख्या ठिकाणी मुलीला एकटे सोडणे त्यांना सुरक्षित वाटत नव्हते. याच भीतीपोटी त्यांनी संभाजीनगरमधील एका २२ वर्षीय रिक्षाचालक मुलाशी तिचे लग्न ठरवले होते. लग्नासाठी सर्व तयारी झाली होती, आहेराची भांडीकुंडी लावली होती, मात्र कायद्याच्या सतर्कतेने हा अनर्थ टळला.
महिला व बालविकास समितीच्या आम्रपाली बोर्डे यांनी पालकांचे लेखी जबाब घेतले. मुलीचे वय पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणे हा केवळ कायद्याने गुन्हाच नाही, तर मुलीच्या आरोग्यासाठीही घातक असल्याचे त्यांना पटवून देण्यात आले. दामिनी पथकाने दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन करून त्यांना कडक समज दिली. दहावीत शिकणाऱ्या त्या मुलीला आता बालविवाहाच्या बेडीतून मुक्त करून पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाणार आहे.