पोस्को गुन्ह्यात आरोपीस २० वर्षांचा सक्त कारावास
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोस्को गुन्ह्यातील आरोपीस कल्याण जिल्हा न्यायालयाने २० वर्षांचा सक्त कारावास ठोठावला आहे. मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ६७४/२०१९ (स्पेशल केस क्र. ४/२०२०) मधील आरोपी हनुमंत उर्फ बाळू दत्तात्रय उबाळे (वय २९) याला हा कठोर निकाल सुनावण्यात आला.
या प्रकरणाचा निकाल दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी कल्याण येथील ६ वे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश मा. श्रीमती व्ही. ए. पत्रावळे यांनी दिला. न्यायालयाने पोस्को कायद्याच्या कलम ६ अंतर्गत आरोपीस २० वर्षांचा सक्त कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
याशिवाय भारतीय दंड संहिता कलम ३५४ अंतर्गत ३ वर्षांचा सक्त कारावास व ५ हजार रुपये दंड, कलम ५०६ अंतर्गत २ वर्षे सक्त मजुरी व ५ हजार रुपये दंड, कलम ३२३ अंतर्गत २ वर्षांचा सक्त कारावास व ३ हजार रुपये दंड तसेच पोस्को कलम ८ अंतर्गत ३ वर्षे सक्त मजुरी व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत.
या खटल्यात सरकारी अभियोजनाची बाजू सरकारी वकील श्रीमती भामरे पाटील व श्रीमती भोईर यांनी प्रभावीपणे मांडली. प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक भास्कर दिनकर सूर्य (मानपाडा पोलीस ठाणे) यांनी केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपन शिंदे व पोलीस निरीक्षक जयपाल सिंग राजपूत यांनी तपासाला मार्गदर्शन केले. न्यायालयीन पैरवीचे काम पोलीस हवालदार ए. आर. गोगरकर व पोलीस नाईक प्रवीण माने यांनी पाहिले.
या निकालामुळे लैंगिक अत्याचाराविरोधात कठोर भूमिका कायम ठेवण्याचा न्यायालयाचा संदेश अधोरेखित झाला आहे.