मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात ठाकरे आणि भाजपचे नगरसेवक आमनेसामने; भाजपकडून मोदी-मोदी’तर ठाकरेगटा कडून ‘चोर है’च्या दिल्या घोषणा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच पालिकेची सत्ता हस्तगत केल्यानंतर बुधवारी भाजपचा महापौर विराजमान झाला. भाजपच्या रितू तावडे यांची बुधवारी अधिकृतरित्या महापौर म्हणून निवड झाली. त्यामुळे बुधवारी मुंबई महानगरपालिकेतील प्रशासक राजवट संपुष्टात येऊन सत्ता लोकप्रतिनिधींच्या हातात आली. मात्र, सत्तारोहणाच्या या पहिल्याच दिवशी भाजप आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. भाजपच्या नगरसेवकांनी हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर महायुतीचे सर्व नगरसेवक मुंबईत महानगरपालिकेत आले. पालिका सभागृहात महायुतीचे नगरसेवक आल्यानंतर जोरदार शंखनाद करण्यात आला. भाजपच्या महापौरांच्या सत्तारोहणाच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांच्या अंगात प्रचंड उत्साह संचारला होता.
यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी जय श्रीराम आणि मोदी-मोदीच्या घोषणा देऊन पालिका सभागृह डोक्यावर घेतले. भाजपच्या नगरसेवकांकडून मोदी-मोदीचा जयघोष थांबतच नव्हता. तेव्हा समोर उभ्या असलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपच्या ‘मोदी-मोदी’ पाठोपाठ अचानक ‘चोर है, चोर है’, अशा घोषणा सुरु केल्या. ठाकरे गटाच्या या अनपेक्षित पवित्र्यामुळे भाजप नगरसेवकांनी ‘मोदी-मोदी’च्या घोषणा थांबवल्या. मात्र, लगेचच भाजपच्या नगरसेवकांनी ‘देवाभाऊ-देवाभाऊ’ नावाचा गजर सुरु केला. त्यावर कोणीही ‘चोर है, चोर है’ घोषणा देण्याची हिंमत दाखवली नाही. मात्र, ठाकरे गटाच्या नगरसेवकांनीही ‘ठाकरे-ठाकरे’ नावाचा जयघोष सुरु केला. या घोषणांमुळे पालिकेचे सभागृह दणाणून गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम सभागृहाच्या गॅलरीत बसून हा प्रकार शांतपणे पाहत होते. पहिल्याच दिवशी ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने आल्याने आगामी काळातही या दोन पक्षांमध्ये अशाचप्रकारची खडाजंगी होण्याची चिन्हं दिसत आहेत.
महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी असे महायुतीचे दोन शिलेदार विराजमान झाले आहे. मुंबई महानगरपालिकेला लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन देण्याबाबत आम्ही लोकांना मतं मागितली होती. मुंबईच्या जनतेने जो प्रतिसाद दिला होता, त्याला अनुरूप आज पदारोहण होत आहे. मी रितू तावडे यांचं अभिनंदन करतो. एक अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी मागच्या काळातही मुंबईकरांच्या प्रश्नाकरता आक्रमक भूमिका घेतली आहे. यापुढेही त्यांच्या माध्यमातून मुंबईच्या विकासाचा कार्यक्रम महायुतीच्या सरकारने सुरु केला आहे तो महानगरपालिकेच्या माध्यमातून योग्यप्रकारे राबवला जाईल.