जेलमध्ये असतानाही पगार; केडीएमसीतील गंभीर हलगर्जीपणा उघड
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेचा (केडीएमसी) कारभार पुन्हा एकदा प्रश्नांकित झाला आहे. बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली तब्बल ४० दिवस न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कर्मचाऱ्याला त्या कालावधीतही महापालिकेकडून पगार देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे प्रशासकीय यंत्रणेतील समन्वयाचा अभाव आणि अंतर्गत नियंत्रणातील त्रुटी अधोरेखित झाल्या आहेत.
डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात ३ मे २०२५ रोजी स्वप्नील जोशी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर स्वप्नील जोशी तब्बल ४० दिवस न्यायालयीन कोठडीत होता. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली.
मात्र, अटकेच्या वेळी तसेच तपासादरम्यान स्वप्नील जोशी हा केडीएमसीचा कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांच्या निदर्शनास आली नव्हती. तपास सुरू असतानाच सुमारे सहा महिन्यांनंतर, २७ डिसेंबर २०२५ रोजी मानपाडा पोलीस ठाण्याने केडीएमसी प्रशासनाला अधिकृत पत्र पाठवून संबंधित आरोपी हा महापालिकेचा कर्मचारी असून तो ४० दिवस तुरुंगात होता, अशी माहिती दिली. हे पत्र प्राप्त होताच महापालिका प्रशासनात खळबळ उडाली.
या काळात संबंधित कर्मचाऱ्याला नियमित पगार देण्यात आल्याचे समोर आल्याने प्रशासकीय जबाबदारी, माहितीची देवाणघेवाण आणि शिस्तभंग कारवाईबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रकरण उघडकीस आल्यानंतर केडीएमसी प्रशासनाने अंतर्गत चौकशीचे संकेत दिले असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.