मुंबई महापौरपदी रितू तावडे, उपमहापौरपदी संजय घाडी यांची बिनविरोध निवड
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवड मंगळवारी (११ फेब्रुवारी) बिनविरोध पार पडली. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या संयुक्त उमेदवार म्हणून श्रीमती रितू राजेश तावडे यांची महापौरपदी, तर श्री. संजय घाडी यांची उपमहापौरपदी निवड झाली.
महापौर व उपमहापौर पदासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी, शनिवारी (७ फेब्रुवारी) दोन्ही पदांसाठी अनुक्रमे रितू तावडे आणि संजय घाडी यांचेच एकमेव अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे कोणताही विरोधी अर्ज न आल्याने या दोन्ही पदांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली.
महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात पार पडलेल्या निवड प्रक्रियेचे पिठासीन अधिकारी म्हणून महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कामकाज पाहिले. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी आणि महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे उपस्थित होत्या.
निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधींनी महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
महापौर आणि उपमहापौरांनी आपल्या भाषणात मुंबईच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला. त्यानंतर सभागृहातील महापुरुषांच्या पुतळ्यांना तसेच महानगरपालिका मुख्यालयासमोरील सर फिरोजशहा मेहता यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, हुतात्मा स्मारक, चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक येथे पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.