लीलावती रुग्णालयातून परमबीर सिंग यांची हकालपट्टी; लाचखोरी, धमक्यांचे गंभीर आरोप
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. डॉक्टरांकडून बढतीसाठी २५ लाख रुपयांची मागणी, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धमक्या देणे, तसेच ड्युटीच्या वेळी मद्यपान करून येणे, असे गंभीर आरोप रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.
पोलीस सेवेतून निवृत्तीनंतर जुलै २०२४ मध्ये परमबीर सिंग यांची लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांच्या कार्यकाळात त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती लीलावती रुग्णालयाचे ट्रस्टी राजीव मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली. कनिष्ठ डॉक्टरांना थेट बढती देण्याच्या बदल्यात २५ लाख रुपयांची मागणी केल्याच्या तक्रारी आल्या असून, या आरोपांची अंतर्गत चौकशी सुरू असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले.
परमबीर सिंग यांच्याविरोधात एकूण पाच तक्रारी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांनी वेळोवेळी डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या दहा विश्वस्तांनी सिंग यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतल्याचा दावा ट्रस्टी मेहता यांनी केला. पाच वर्षांची नियुक्ती असतानाही त्यांना मुदत संपण्यापूर्वीच पदावरून हटविण्यात आले आहे.
दरम्यान, परमबीर सिंग यांनीही हकालपट्टीच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी रुग्णालयातील विरोधी गटातील विश्वस्तांविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, लीलावती रुग्णालय प्रशासनावर तब्बल १२०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. तसेच हकालपट्टीच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया देत ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. “अखेर या माणसाला त्याच्या कर्माचे फळ मिळाले,” अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.
लीलावती रुग्णालयातील या घडामोडींमुळे वैद्यकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पुढील कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.