जुहू कोळीवाडा चौपाटीवर आढळला शिर नसलेला मृतदेह; पत्नी पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

जुहू कोळीवाडा चौपाटीवर आढळला शिर नसलेला मृतदेह; पत्नी पोलिसांच्या ताब्यात

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईतील जुहू कोळीवाडा चौपाटीवर एका पोत्यात पुरुषाचा छिन्नविछिन्न आणि कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे, या मृतदेहाचे शिर गायब होते. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मृताची ओळख पटवली असून, या प्रकरणी त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुहू कोळीवाडा समुद्रकिनाऱ्याजवळ एका संशयास्पद पोत्यातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोते उघडले असता, त्यात एका पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळला. मृतदेहाचे शिर नसल्याने सुरुवातीला ओळख पटवणे कठीण होते, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास आणि बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव अनिल गौड (वय, ३०) असे आहे. अनिल हा गेल्या २९ जानेवारीपासून बेपत्ता होता. तो बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवण्यात आली होती. १०-१२ दिवसांपासून मृतदेह पोत्यात असल्याने तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता.मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि कलम २३८ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

या भीषण हत्याकांडामागे नेमके कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत. प्राथमिक संशयावरून पोलिसांनी अनिल गौड याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घरगुती वाद की अन्य काही कारण, याचा तपास सध्या सुरू आहे. मृतदेहाचे शिर अद्याप सापडलेले नाही, त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon