मानकोली उड्डाणपुलावर रेसिंग-स्टंटबाजी; विष्णुनगर पोलिसांची कडक कारवाई

Spread the love

मानकोली उड्डाणपुलावर रेसिंग-स्टंटबाजी; विष्णुनगर पोलिसांची कडक कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : मोठागांव ते मानकोली उड्डाणपुलावर भरधाव वेगात रेस लावत स्टंटबाजी करणाऱ्या वाहनचालकांवर विष्णुनगर पोलीस ठाणे आणि शहर वाहतूक शाखा (डोंबिवली उपविभाग) यांनी संयुक्त कारवाई केली आहे. २६ जानेवारी रोजी या प्रकाराच्या चित्रफिती प्रसारमाध्यमांत प्रसारित झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

कारवाईत थार जिप (MH05-FG-5656) चालक पियुष द्वारकानाथ म्हात्रे (२१) याच्यावर मोटार वाहन कायद्याच्या कलम १००(२)/१७७ अंतर्गत दंडात्मक कारवाई करून १,५०० रुपये दंड तसेच ३,५०० रुपये यकबाकी वसूल करण्यात आली. हुंडई वेरणा (MH05-GD-0049) चालक वेदांत महेश सावंत (१८) याच्यावर कलम १८४ अंतर्गत कारवाई झाली.

रेसिंगचा व्हिडीओ चित्रीत केल्याप्रकरणी स्कॉर्पिओ (MH05-CV-3988) मधील विशाल दिनेश विश्वकर्मा (२२) आणि कृष्णा जितेंद्र विश्वकर्मा (१९) यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ मधील कलम ११२/११७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच स्कॉर्पिओ (MH46-CR-4111) चालक प्रदीप आंबादास ढाकणे (२१) याच्यावरही मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत कारवाई करण्यात आली.

मानकोलीसारख्या उड्डाणपुलावर वेगमर्यादा ओलांडून वाहन चालविणे जीवघेणे ठरू शकते. अशा प्रकारांमुळे चालकांसह इतर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो, असे स्पष्ट करत पोलिसांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. भविष्यात अशा कृत्यांवर आणखी कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-३, कल्याण) व सहायक पोलीस आयुक्त (डोंबिवली विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे, सचिन लोखंडे, विष्णुनगर पोलीस पथक आणि शहर वाहतूक शाखेच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon