बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला; डोंबिवलीतील सोहम कटरेचा रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : बारावीच्या पहिल्याच पेपरसाठी घरातून निघालेल्या विद्यार्थ्यावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी घडली. डोंबिवली येथील सोहम सचिन कटरे (वय १८) याचा लोकल रेल्वेमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. कळवा–मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सकाळच्या गर्दीत तोल जाऊन तो खाली पडल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
सोहम हा डोंबिवली येथे वास्तव्यास होता. बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर देण्यासाठी तो लोकलने कळव्यातील मनिषा विद्यालयातील परीक्षा केंद्राकडे निघाला होता. मात्र सकाळच्या वेळेतील प्रचंड गर्दीमुळे रेल्वेच्या दरवाजाजवळ उभा असताना अचानक धक्का बसून त्याचा तोल गेला आणि तो रेल्वेखाली पडला. या अपघातात तो जागीच ठार झाला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या दुर्घटनेमुळे कटरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. बारावीच्या पहिल्याच परीक्षेला जाताना एका होतकरू विद्यार्थ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.