१.५० कोटींचा अवैध गुटखा जप्त; समतानगर पोलिसांची मोठी कारवाई
दैनिक पोलीस महानगरच्या सतर्कतेमुळे पोलिसांना मदत
सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही गुजरात व इतर राज्यांतून मुंबईत मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा आणला जात असल्याचे प्रकार सुरूच आहेत. अशाच एका मोठ्या तस्करीवर समतानगर पोलिसांनी आज सकाळी कारवाई करत सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या एका कंटेनरमधून अवैध गुटखा आणला जात असल्याची माहिती ‘दैनिक पोलिस महानगर’ (मराठी)चे पत्रकार अतीश शिंदे यांना मिळाली होती. संबंधित कंटेनर दहिसर चेक नाका पार केल्याचे लक्षात येताच, सकाळी सुमारे पाचच्या सुमारास ही माहिती मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर समतानगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत MH 43 BG 4150 क्रमांकाचा कंटेनर अडवून तपासणी केली.
तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये SHK (King) या नावाचा प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणावर आढळून आला. हा गुटखा वेगवेगळ्या पोत्यांमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. कारवाईची माहिती मिळताच बांद्रा येथील अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे अधिकारी योगेश कांसे, अक्षय रायकर आणि लखन मुखीरवाड हे समतानगर पोलिस ठाण्यात दाखल झाले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुहास सातव व एफडीए अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे कंटेनरमधील मालाची मोजणी केली. यामध्ये एकूण १२० पोती (कोनी) गुटखा आढळून आली. प्रत्येक पोत्यावर 31-D, 32-D, 31-M, 31-W, 42-W असे वितरण कोड नमूद करण्यात आले होते.
मोजणीनुसार गुटख्याची किंमत सुमारे १ कोटी २५ लाख रुपये असून, कंटेनरची किंमत अंदाजे २५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा प्रकारे एकूण १ कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी कंटेनर चालक घप्पार फारूक मियां (वय ४१, रा. कर्नाटक) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे. लोरीचा मालक सय्यद रसूल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, या अवैध गुटखा तस्करीमागील संपूर्ण साखळीचा तपास सुरू असून, संबंधित सर्वांवर कठोर कारवाई करून आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक सुहास सातव यांनी दिली आहे.