मेट्रोतील सतर्कतेमुळे १५ तोळे सोन्याची बॅग सुखरूप परत; पुणे मेट्रो कर्मचाऱ्यांचे कौतुक
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : मेट्रो प्रवासादरम्यान क्षणभराच्या निष्काळजीपणामुळे १५ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग हरवल्याने एका महिला प्रवाशाची मोठी धांदल उडाली होती. मात्र, पुणे मेट्रो प्रशासनाच्या सतर्कता आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे ही मौल्यवान बॅग काही वेळातच सुरक्षितपणे परत मिळाल्याने संबंधित महिलेने सुटकेचा निश्वास सोडला.
२४ मे रोजी आरटीओ पुणे मेट्रो स्थानकावर एका प्रवाशाने बॅगेज स्कॅनिंग मशीनजवळ बॅग विसरल्याची माहिती पुणे रेल्वे स्थानक (पीआरएस) येथील स्थानक नियंत्रकांना दूरध्वनीवरून मिळाली. बॅगमध्ये अंदाजे १५ तोळे सोन्याचे दागिने असल्याचे समजताच मेट्रो प्रशासनाने तातडीने शोधमोहीम सुरू केली.
पीआरएस स्थानक नियंत्रकांनी त्वरित सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित प्रवाशाची ओळख पटवली. दरम्यान, स्कॅनिंग मशीन परिसरात तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना ती बेवारस बॅग आढळून आली. त्यांनी तत्काळ बॅग सुरक्षित ताब्यात घेतली. तपासणीअंती बॅगमधील सर्व सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर संबंधित प्रवासी तृप्ती तारापुरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्या पीआरएस ते पिंपरी-चिंचवड असा प्रवास करत होत्या. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पीआरएस स्थानक गाठले. आवश्यक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर १५ तोळे सोन्यासह त्यांची बॅग त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
मौल्यवान दागिने सुखरूप परत मिळाल्यानंतर तृप्ती तारापुरे यांनी मेट्रो प्रशासन, स्थानक नियंत्रक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या घटनेमुळे पुणे मेट्रोच्या सतर्क यंत्रणेचे प्रवाशांकडून कौतुक होत आहे.