दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडून शुभेच्छा
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : राज्यात मंगळवारपासून (१० फेब्रुवारी) बारावीच्या, तर २० फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत असून या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, वेळेचे योग्य नियोजन करावे तसेच तणावमुक्त राहून परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन महापौरांनी केले. यशासाठी सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पालक व शिक्षकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना महापौर पिंपळोलकर यांनी सांगितले की, या काळात विद्यार्थ्यांना मानसिक आधार व योग्य प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. “विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवावा. अपयशाची भीती न बाळगता शांतपणे परीक्षेला सामोरे जावे. प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होवो, हीच माझी सदिच्छा आहे,” असे त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.