१५ महिन्यांचा संप अखेर मिटला; ‘अखिल वायर्स’ कामगारांना ६,२५० रुपयांची पगारवाढ
‘जनरल मजदूर सभा’च्या मध्यस्थीने ३ वर्षांचा ऐतिहासिक करार; कंपनीत आनंदोत्सव
बोईसर / विभूती मेस्त्री
कोरोना काळापासून रखडलेला पगारवाढीचा प्रश्न, तब्बल १५ महिने चाललेला बेमुदत संप आणि अखेर यशस्वी तोडगा… अशा नाट्यमय घडामोडींनंतर तारापूर एमआयडीसीतील ‘अखिल वायर्स प्रा. लि.’ कंपनीतील कामगारांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ‘जनरल मजदूर सभा’ युनियनच्या मध्यस्थीने कामगारांना दरमहा ६ हजार २५० रुपयांची घसघशीत पगारवाढ मिळाली असून, पुढील तीन वर्षांसाठी ऐतिहासिक वेतन करार करण्यात आला आहे. या कराराच्या आनंदात २१ मे रोजी कंपनी परिसरात विशेष कार्यक्रम घेऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
तारापूर एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक जी-३/९ येथील ‘अखिल वायर्स प्रा. लि.’ कंपनीत ४१ स्थानिक कायमस्वरूपी कामगार कार्यरत आहेत. कोरोना काळात पगारवाढ न झाल्याने कामगार आणि कंपनी व्यवस्थापनात अनेक वेळा चर्चा झाली; मात्र त्यातून कोणताही तोडगा निघाला नव्हता.
दरम्यान, २०२२ मध्ये कामगारांनी विविध युनियनचे सदस्यत्व घेतले. मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी आणि एका नेत्याच्या चुकीच्या सल्ल्यामुळे ६ एप्रिल २०२३ पासून कामगारांनी बेमुदत संप पुकारला. सहाय्यक कामगार आयुक्त विजय चौधरी यांनी संप न करता चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा सल्ला दिला होता. तरीही योग्य नेतृत्व न मिळाल्याने कामगार तब्बल १५ महिने कंपनीच्या गेटवर आंदोलन करत राहिले.
या काळात २०२४ मध्ये कामगारांची भेट ‘नवा हाल’चे संपादक तथा ‘जनरल मजदूर सभा, ठाणे’चे पदाधिकारी जगदीश करोतीया यांच्याशी झाली. त्यांनी कामगारांची व्यथा समजून घेत त्यांची भेट युनियनचे सरचिटणीस संजय वढावकर यांच्याशी घडवून आणली. त्यानंतर कामगारांनी ‘जनरल मजदूर सभा’चे सदस्यत्व स्वीकारले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगार चळवळीत अनुभव असलेले नेते संजय वढावकर यांनी तातडीने कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा सुरू केली. अवघ्या दोन बैठकींत सकारात्मक तोडगा निघाला आणि २० जुलै २०२४ रोजी तब्बल १५ महिन्यांचा संप मागे घेत कामगार पुन्हा कामावर रुजू झाले.
उत्पादन पूर्ववत सुरू झाल्यानंतर युनियनने पगारवाढीसाठी मागणीपत्र कंपनी प्रशासनाला दिले. त्यानुसार ठाण्यातील राममूर्ती रोड येथील युनियन कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला युनियनच्या अध्यक्षा संज्योत वढावकर, सरचिटणीस संजय वढावकर, सचिव जगदीश उपाध्याय, कोषाध्यक्ष प्रशांत शेट्ये, पालघर जिल्हा संघटक सचिव जगदीश करोतीया, कामगार प्रतिनिधी तसेच कंपनीचे मालक निखिल उल्टीकर उपस्थित होते.
विशेष म्हणजे, केवळ एकाच बैठकीत पुढील तीन वर्षांसाठी दरमहा ६ हजार २५० रुपयांची पगारवाढ मंजूर करण्यात आली. हा करार १ एप्रिल २०२५ पासून लागू करण्यात आला आहे.
दरम्यान, या ऐतिहासिक करारानिमित्त २१ मे रोजी कंपनीच्या आवारात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला युनियनचे सर्व पदाधिकारी, कंपनीचे मालक मनोहर उल्टीकर, निखिल उल्टीकर, मॅनेजर नाईक तसेच सर्व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.