लग्नाच्या रिसेप्शनमधून वऱ्हाडी थेट रुग्णालयात; भांडुपमध्ये हॉलची लिफ्ट कोसळून पाच जण जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – लग्नाचे रिसेप्शन उरकून चार ते पाच जण लिफ्टने खाली उतरत असताना लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरुन थेट खाली कोसळली. त्यात ते जखमी झाल्याची घटना भांडुप पोलीस ठाण्यासमोरील स्टार बँक्वेट हॉलमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी लिफ्टची डागडुजी करणाऱ्या कंपनीवर गुन्हा नोंदविला आहे.
वर्षा गुरखे यांच्यासह लग्नाला आलेले नातेवाईक जखमी झाले. गुरखे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या कंपनीतील सहकारी मित्राच्या लग्नाचे रिसेप्शन १ फेब्रुवारीला स्टार बँक्वेट हॉलमध्ये होते. रिसेप्शन झाल्यानंतर त्या पतीसह घरी जाण्यास निघाल्या. लिफ्टमध्ये सात ते आठ जण झाल्याने त्यांचे पती लिफ्टमधून बाहेर पडले. नंतर लिफ्ट खाली येत असतानाच बिघाड झाल्याने ती खाली कोसळली.
लिफ्टमध्ये कोसळताच आतील नागरिक किंचाळले. बेसमेंटमध्ये अटकलेल्या नागरिकांना लिफ्टचा दरवाजा उघडून त्यांना बाहेर काढण्यात आले. चार ते पाच जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. वर्षा यांच्या डाव्या व उजव्या पायाच्या तळव्याला मार लागला. दोन्ही पायांच्या गुडघ्याला फ्रॅक्चर असून उपचार सुरू आहेत.
लिफ्ट देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तपासाअंती ज्यांचा सहभाग समोर येईल त्या संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे भांडुप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले. घटनेच्या दिवशी लिफ्ट फक्त तळमजल्यावर न थांबता थेट खाली गेली. त्यामुळे गोंधळ झाला. यामध्ये आमच्या हॉलचा संबंध नाही. दाखल गुन्ह्याबाबत माहिती नाही.
हॉल मालकाने सर्व जबाबदारी घेणे गरजेचे होते. मात्र एवढी मोठी घटना होऊनही कोणी विचारपूसही केली नाही. पत्नीच्या उपचारासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फेरी सुरू आहे. संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी. यामध्ये फक्त लिफ्ट दुरुस्ती करणाऱ्यालाच जबाबदार न धरता सर्वांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी करण्यात आली आहे.