पिंपरी-चिंचवडमध्ये लॉज व स्पामध्ये अनैतिक धंद्यांचा पर्दाफाश
पोलीस धाड; आठ महिलांची सुटका, रॅकेट उघड
पोलीस महानगर नेटवर्क
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात स्पा सेंटर आणि लॉजच्या आड चालविण्यात येणाऱ्या अनैतिक वेश्याव्यवसायाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने केलेल्या समन्वयित धाडीत शहरातील विविध ठिकाणांहून एकूण आठ महिलांची सुटका करण्यात आली असून या कारवाईमुळे शहरातील अनैतिक धंद्यांचे रॅकेट उघडकीस आले आहे.
विशालनगर येथील इंटरनल फॅमिली स्पा येथून चार महिलांची, निगडी येथील ईगल स्पा मधून दोन महिलांची सुटका करण्यात आली. याशिवाय कृष्णा लॉज आणि आळंदी येथील योगीराज लॉज येथे छापे टाकून प्रत्येकी एका महिलेची सुटका करण्यात आली आहे.
स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्याव्यवसायाविरोधात कठोर भूमिका घेत पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे यांनी कारवाईचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंटरनल फॅमिली स्पा येथे रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी संबंधित स्पा चालवणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्पा मॅनेजर अब्दुल मोहम्मद हुसेन कलाम याला अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस ठाण्यात पीटा (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, शहरात अशा प्रकारच्या बेकायदेशीर धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.