ठाणे महापालिकेत महापौर–उपमहापौरांची बिनविरोध निवड
शर्मिला पिंपळोलकर महापौर, कृष्णा पाटील उपमहापौर
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांची निवडणूक मंगळवारी (दि. ३ फेब्रुवारी) बिनविरोध पार पडली. पीठासीन अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौरपदी, तर भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांची उपमहापौरपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
ठाणे महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी ११.३० वाजता विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्यासह महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते.
निवडीची घोषणा झाल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर व उपमहापौर कृष्णा पाटील यांचे तुळशीचे रोप देऊन अभिनंदन केले. सभागृहात उपस्थित नगरसेवक व मान्यवरांनीही नव्या नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या.