एकनाथ शिंदे यांचाही राज यांच्या पावलावर पाऊल!
मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदे सेनेकडून स्वतंत्र गट नोंदणी करण्याचा निर्णय; महायुतीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीत बाजी मारणाऱ्या महायुतीनं अद्याप गटनोंदणी केलेली नाही. भाजप , शिवसेनेनं मुंबईत ११८ जागा जिंकल्या. भाजपनं ८९, तर शिंदेसेनेनं २९ जागांवर बाजी मारली. पण दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची नोंदणी झालेली नाही. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांचा एकच गट असावा, असा भाजपचा आग्रह आहे. तर पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी शिवसेना आपला वेगळा गट तयार करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. अखेर हा पेच सुटलेला आहे. नवी मुंबईत असलेल्या कोकण भवनात आज गटनोंदणीची प्रक्रिया पार पडेल.
भाजप आणि शिवसेनेची गट नोंदणी आज होईल. दोन्ही पक्षांचे दोन स्वतंत्र गट असतील. त्यांची नोंदणी वेगवेगळी होईल. त्यामुळे शिंदेसेनेला त्यांचं स्वतंत्र अस्तित्व राखता येईल. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची एक गट म्हणून नोंदणी होईल. या गटात शिवसेनेचे २९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ नगरसेवक असतील. त्यामुळे महायुतीचं एकत्रित संख्याबळ ११८ वरुन १२१ वर जाणार आहे.
मुंबई महापालिकेत विरोधकांना चांगलं यश मिळालं आहे. शिवसेना उबाठाच्या ६५, तर काँग्रेसच्या २४ जागा निवडून आल्या. महापालिकेत बहुमतासाठी लागणारा आकडा ११४ इतका आहे. भाजप, शिवसेनेचं एकत्रित संख्याबळ ११८ आहे. दोघांनी एकच गट म्हणून नोंदणी केल्यास त्याचा फायदा महायुतीला स्थायीसह अन्य समित्यांमध्ये होईल. तिथे महायुतीचं संख्याबळ वाढेल, असा भाजपचा युक्तिवाद होता. पण शिवसेना स्वतंत्र गट नोंदणीवर ठाम राहिली आहे. आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाला आहे.
भाजप-शिवसेनेची एकत्रित गट नोंदणी व्हावी यासाठी भाजप आग्रह होता. पण शिवसेनेनं स्वतंत्र नोंदणीचा आग्रह कायम ठेवला. तर दुसरीकडे महायुती विरोधात एकत्र लढलेल्या ठाकरे बंधूंच्या पक्षांनीदेखील त्यांचे गट वेगवेगळे नोंदवले. शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्या नगरसेवकांचा एकच गट असावा. शिवशक्ती कायम राहावी, असा उद्धव ठाकरेंचा आग्रह होता. पण राज यांनी मनसेच्या नगरसेवकांच्या गटाची स्वतंत्र नोंदणी केली. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनीही राज यांच्या पावलावर पाऊल टाकलं आहे.