नऊ वर्षांच्या मुलावर पिसाळलेल्या कुत्र्यांचा हल्ला; उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – उनाड कुत्र्यांच्या हल्ल्यात आजवर अनेकांचे जीव गेले आहेत. यापूर्वी लहान मुलेही जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, काही या उनाड कुत्र्यांच्या चाव्याचे बळी ठरले आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना कोकणात रायगड जिल्ह्यात कर्जत येथे घडली आहे.
उनाड कुत्र्यांच्या हल्ल्यात एका ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऋषिकेश देवेंद्र पवार (९) याच्यावर पिसाळलेला कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर उपचार करूनही मुलाच्या तब्येतीत फारशी सुधारणा होत नव्हती अखेर ऋषिकेश पवार याचा ३१जानेवारी २०२६ रोजी दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील पवार कुटुंब नोकरीसाठी इकडे मुंबई परिसरात वास्तव्यास आहे. हे कुटुंब कर्जत तालुक्यातील उमरोली गारपोळी येथील सोसायटी मध्ये राहत आहे. ३ जानेवारी रोजी समृद्धी कॉम्प्लेक्स पोद्दार भिवपुरी कर्जत येथे गुरू श्रद्धा सोसायटी राहणारा ऋषिकेश देवेंद्र पवार याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने एका निरागस जीवाचा बळी घेतला आहे. रस्त्यावरून चालत असताना भटक्या कुत्र्यांच्या टोळीने ९ वर्षांच्या मुलावर अचानक प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी तात्काळ त्याला उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, कुत्र्यांनी मुलावर केलेल्या हल्ल्याचे थरारक दृश्य त्यात कैद झाले आहे. या घटनेनंतर कर्जत परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.