खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांची हजेरी; व्यासपीठावर म्हस्केकडून राऊतांचा सन्मान

खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांची हजेरी; व्यासपीठावर म्हस्केकडून राऊतांचा सन्मान

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – शिवसेनेतील फुटीनंतर दिवसागणिक एकमेकांवर सोडले जाणारे धारदार टीकेचे बाण, अशी ओळख असलेल्या शिवसेनेतील दोघा फायरब्रॅण्ड नेत्यांनी काही काळासाठी राजकीय शत्रुत्व दूर ठेवले. निमित्त होते, विवाह सोहळ्याचे. शिवसेनेचे ठाणे लोकसभा खासदार व प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला शिवसेना (उबाठा) खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी हजेरी लावली. यावेळी राऊत यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. तसेच व्यासपीठावर म्हस्के यांनी राऊत यांचा सन्मान केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मंत्री, खासदार, आमदारांनी या विवाहसोहळ्याला हजेरी लावली. या विवाहसोहळ्यात राऊत यांची भेट लक्षणीय ठरली.

कितीही टोकाचे मतभेद असले तरी, कौटुंबिक नातेसंबंध राखण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याचा प्रत्यय गुरुवारी ठाण्यात आला. शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांचे सुपुत्र उद्योजक आशुतोष म्हस्के यांचा हर्षदा यांच्याशी विवाह संपन्न झाला. या निमित्ताने आयोजित स्वागत समारंभ सोहळ्याला संजय राऊत यांनी हजेरी लावली. शिवसेनेतील फुटीनंतर नरेश म्हस्के यांच्याकडे शिवसेनेच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी आली. या माध्यमातून त्यांनी नेहमीच शिवसेनेवर (उबाठा) टीकेची तोफ डागली. अनेकदा म्हस्के यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊत यांच्यावर टीकेची बाण सोडले. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून राऊत यांनी म्हस्के यांना लक्ष्य केले. मात्र म्हस्के यांच्या मुलाच्या लग्नामध्ये राऊत यांची एण्ट्री होताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

दोन्ही शिवसेनेचे राजकीय मार्ग स्वतंत्र झाल्यानंतर विविध वादाच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी राऊत यांच्याविरोधात ठाण्यात उग्र आंदोलन केले. ठाण्यातील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या टेंभी नाक्यावर राऊत यांच्याविरोधात शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन करत त्यांना ठाण्यात पाऊल ठेवू दिले जाणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र तेच पदाधिकारी राऊत यांच्या स्वागताला या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी हजर होते. याप्रसंगी शिवसेनेचे ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार यांनी राऊत यांना स्वागत समारंभाच्या व्यासपीठावर आणले. पवार यांनीही आस्थेने राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करत हात धरून गर्दीतून वाट काढत व्यासपीठावर नेले. राजकीय मतभेद कितीही असले तरी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी असून राऊत यांनी अगदी मोकळेपणाने आमच्याशी संवाद साधल्याचे पवार यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, उदय सामंत, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, राज्यसभेचे खासदार रामदास आठवले, भाजप आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस नजीब मुल्ला, प्रवक्ते आनंद परांजपे यांच्यासह सर्वपक्षीय खासदार, आमदार, नगरसेवक, प्रशासकीय व पोलिस अधिकारी, कलाकारांनीही या विवाह सोहळ्याला हजेरी लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon