कल्याणमध्ये मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश; ४ आरोपी जेरबंद, ७ दुचाकी जप्त
पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : शहरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या दुचाकी चोरीच्या मालिकेचा उलगडा करत बाजारपेठ पोलिसांनी चार जणांच्या टोळीला अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यांतील सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
२८ एप्रिल २०२६ रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे सम्राट अशोक चौक परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी समर्थ नरसु पाटील (वय १९, रा. कल्याण पश्चिम) याला चोरीच्या होंडा अॅक्टिव्हा स्कूटरसह ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने इतर तीन साथीदारांसह गेल्या महिनाभरात कल्याण शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी हर्ष रमेश परदेशी (२१), प्रणित दिनेश शितप (२१) आणि रंगनाथ उर्फ सागर सुखदेव ढवळे (१८) या आरोपींनाही अटक केली. आरोपींकडून होंडा अॅक्टिव्हा, अॅक्टिव्हा १२५, टीव्हीएस एनटॉर्क, सुझुकी बर्गमन आणि अॅक्सेस १२५ अशा विविध कंपनीच्या एकूण सात दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे २ लाख ८० हजार रुपये आहे.
या प्रकरणात बाजारपेठ, महात्मा फुले चौक आणि खडकपाडा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड व त्यांच्या पथकाने केली.
दरम्यान, या कारवाईमुळे कल्याण शहरातील वाहनचोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.