अशक्यप्राय परताव्याचे आमिष; TWJ समूहाकडून १२०० कोटींची फसवणूक आर्थिक गुन्हे शाखेकडून तीन आरोपींना अटक

Spread the love

अशक्यप्राय परताव्याचे आमिष; TWJ समूहाकडून १२०० कोटींची फसवणूक
आर्थिक गुन्हे शाखेकडून तीन आरोपींना अटक

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : गुंतवणूकदारांना अशक्यप्राय परताव्याचे आमिष दाखवून तब्बल १२०० कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी TWJ ASSOCIATED PVT. LTD. आणि त्याच्या संलग्न कंपन्यांच्या संस्थापक-संचालकांसह तीन आरोपींना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये समीर सुभाष नार्वेकर (३५), अमित विश्वनाथ बालम (३७) आणि नेहा समीर नार्वेकर (३६) यांचा समावेश आहे.

९ फेब्रुवारी २०२४ ते १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आरोपींनी TWJ ASSOCIATED PVT. LTD. अंतर्गत TWJ Learning Solutions, TWJ Hospitality, TWJ Infrastructure Development, TWJ Business Consulting, TWJ Event Management, TWJ Foundation, TWJ Vastunirmiti Infra, TWJ IT Solutions, TWJ Ventures, TWJ Logistics आणि TWI Media अशा ११ कंपन्या उघडून ठाणेसह राज्यातील १६ जिल्ह्यांत सुमारे ११ हजार गुंतवणूकदारांकडून निधी गोळा केला. बेकायदेशीर योजनांतून अवाजवी परताव्याचे आश्वासन देत गुंतवणूकदारांची रक्कम वळवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी विक्रोळी (पूर्व), मुंबई येथील संजय पुंडलीक मापुसकर (५४) यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात १९ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला १४ गुंतवणूकदारांची सुमारे ३ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक उघड झाली. पुढील तपासात ३७ गुंतवणूकदारांची ७ कोटी ९७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, राज्यभरात एकूण अपहाराची रक्कम सुमारे १२०० कोटी रुपयांपर्यंत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार होते. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोधमोहीम राबवून २९ जानेवारी २०२६ रोजी समीर नार्वेकर व अमित बालम, तर ३० जानेवारी २०२६ रोजी नेहा नार्वेकर यांना अटक केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, उपायुक्त पराग मणेरे आणि सहायक आयुक्त निलीमा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तपास पोलीस निरीक्षक माधवी राजेकुंभार करत आहेत.

दरम्यान, TWJ ASSOCIATED PVT. LTD.कडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे येथे पोलीस निरीक्षक माधवी राजेकुंभार (मो. ८८०५४८६१०० / ०२२-२५३९८५८६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon