चीटिंग व फसवणूक प्रकरणात कळवा पोलिसांची मोठी कारवाई; सराईत आरोपी मुकेश मोरे अटकेत
ठाणे शहरातील कळवा परिसरात घडलेल्या चीटिंग व फसवणुकीच्या गुन्ह्यात कळवा पोलीस स्टेशनने महत्त्वाची कारवाई करत सराईत आरोपी मुकेश दत्तात्रेय मोरे (वय ४७, रा. पारसिक नगर, कळवा) यास अटक केली आहे.
आरोपी मुकेश मोरे याच्याविरोधात यापूर्वीही फसवणुकीचे सहा ते सात गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत नोंद असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. नागरिकांची आर्थिक फसवणूक करून विश्वासघात करणाऱ्या या आरोपीवर ठाणे चीटिंग व फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, तो दीर्घकाळापासून पोलिसांच्या रडारवर होता.
गोपनीय माहितीच्या आधारे कळवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही धडक कारवाई केली. आरोपीस अटक करून पुढील तपास सुरू असून, आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलीस निरीक्षक गायकवाड व त्यांच्या पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे कळवा परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.