अवघ्या सहा तासांत लॅपटॉप चोरीचा उलगडा; कोळसेवाडी पोलिसांची जलद कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण (पूर्व) : रेजेन्सी पार्क, चक्कीनाका परिसरात उभ्या केलेल्या कारची काच फोडून लॅपटॉप चोरी केल्याची घटना घडताच कोळसेवाडी पोलिसांनी अवघ्या सहा तासांत आरोपीला जेरबंद करत चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
दिनांक २७ जानेवारी रोजी रात्री ७.३० ते २८ जानेवारी सकाळी ८ या वेळेत रेजेन्सी पार्क येथे पार्क केलेल्या आय-२० (क्रमांक एम.एच. ०५ सी.व्ही. ६४१०) या वाहनाची काच फोडून गाडीत ठेवलेला डेल कंपनीचा काळ्या रंगाचा लॅपटॉप अज्ञात चोरट्याने लंपास केला होता. याचबरोबर परिसरातील आणखी पाच वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले होते. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने हाती घेतला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. सुजल बाबासाहेब वाघचौरे (वय २१, रा. गोसावीपुरा, चक्कीनाका, कल्याण पूर्व) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे १८ हजार रुपये किमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-३, कल्याण) अतुल झेंडे आणि सहायक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भालेराव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी विशाल वाघ, दत्तु जाधव, गोरखनाथ घुगे, रोहित बुधवंत, विलास जरग आणि दिलीप कोती यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
कोळसेवाडी पोलिसांच्या या तत्परतेमुळे वाहनफोड व चोरीच्या घटनांवर आळा बसेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.