जुहूमध्ये व्यावसायिकाच्या घरातून ५३ लाखांची चोरी; दोन घरकामगार अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई :.मुंबईतील उच्चभ्रू जुहू परिसरात विश्वासघाताची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ७६ वर्षीय व्यावसायिकाच्या घरातून तब्बल ५३ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी दोन घरकामगारांना अटक केली आहे. घरमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून आरोपींनी ही चोरी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नैषध पटेल (७६) हे जुहू येथे वास्तव्यास असून १ जानेवारी रोजी ते पत्नीसमवेत गुजरातला गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत घरात साफसफाईसाठी येणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ५३ लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपींनी चोरून नेला.
पटेल कुटुंब मुंबईत परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला असता, इमारतीतील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून संशयितांचे धागेदोरे हाती लागले.
तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी शक्ती शंकर मंडल आणि विजय देवेंद्र या दोघांना अटक केली. चौकशीत विजय देवेंद्र याने पत्नीच्या आजारपणासाठी पैशांची गरज असल्याने चोरी केल्याचा दावा केला आहे. मात्र शक्ती शंकर मंडल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही चोरीचे तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहेत.