कोळसेवाडीत भांडी खरेदीवरून वाद; दीड तास तणाव
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण: कोळसेवाडी परिसरातील अजय स्टील या भांडी विक्रीच्या दुकानात खरेदीदरम्यान झालेल्या वादातून शुक्रवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. भांड्यांचे दर जास्त असल्याच्या कारणावरून मराठी ग्राहक आणि परप्रांतीय दुकानदार आमनेसामने आले.
ग्राहक महिलेच्या आरोपानुसार, दर न पटल्याने दुकानातून बाहेर पडताच अपशब्द वापरून मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर परिसरात सुमारे दीड तास गोंधळ सुरू होता. मात्र दुकानदारांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. अखेर तणाव निवळला असून कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवण्यात आल्याचे वृत्त नाही.