धुरंदर’ चित्रपटातील अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेचं १० वर्षे लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – बॉलिवूड क्षेत्रात खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून धुरंदर चित्रपटात भूमिका निभावणाऱ्या बड्या अभिनेत्यावर बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. धुरंधर फेम अभिनेता नदीम खानवर दाखल गुन्ह्यानंतर मालवणी पोलिसांकडून अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे.
मुंबईतील मनोरंजन विश्वासाला धक्का देणारी घटना मालाड मालवणी परिसरातून समोर आली आहे. धुरंधर चित्रपटातील अभिनेता नदीम खान यास घरकाम करणाऱ्या महिलेशी जवळपास १० वर्षे बलात्कार व लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तक्रारदार महिला अभिनेता नदीम खानच्या घरी घरकाम करत होती, नदीम खानने तिला लग्नाचे खोटे आश्वासन देत अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवले. सन २०१५ पासून आरोपी नदीम खान याने महिलेचा विश्वास संपादन करुन वारंवार तिच्यावर अत्याचार आणि बलात्कार केला. सुरुवातीला याप्रकरणी तक्रार करण्यास महिलेला भीती वाटत होती. मात्र, आरोपीने लग्नास स्पष्ट नकार दिल्यानंतर आणि मानसिक छळ वाढवल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली.
दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी अभिनेता नदीम खान विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. या अभिनेत्याने मुंबई शहरात आणखी किती महिलांसोबत अशा पद्धतीने विश्वासघात केला आहे, किंवा इतर काही महिलांच्या तक्रारी आहेत का, या अनुषंगाने मालवणी पोलीस अधिक तपास करत आहे.