‘मी एलोन मस्क आहे’ म्हणत मुंबईतील महिलेला १६.३४ लाखांचा गंडा; सायबर फसवणूक उघड
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : जगप्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्क असल्याचे भासवून एका अज्ञात सायबर भामट्याने मुंबईतील महिलेला तब्बल १६.३४ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अतिरिक्त दोन लाख रुपयांची मागणी झाल्यानंतर महिलेला संशय आला आणि हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पूर्व विभाग सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत घडली. संबंधित महिलेचा ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावरून एका व्यक्तीशी संपर्क झाला. या व्यक्तीने स्वतःची ओळख थेट एलोन मस्क अशी करून दिली. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने महिलेला एक मोबाईल ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये नियमित चॅटिंग सुरू झाले.
फसवणूक करणाऱ्याने महिलेला अमेरिकेत नेऊन चांगले आयुष्य देण्याचे आमिष दाखवले. या गोड बोलण्याला बळी पडत महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला. पुढे तिकीट व व्हिसाची व्यवस्था करण्यासाठी ‘जेम्स’ नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. विमा कंपनीत कार्यरत असलेल्या महिलेने जेम्सशी संपर्क साधला. व्हिसा प्रक्रियेच्या नावाखाली वेगवेगळ्या टप्प्यांवर तिच्याकडून पैसे उकळण्यात आले.
दरम्यान, आणखी दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आल्यानंतर महिलेला संशय आला. चौकशी केली असता आपण फसवणुकीला बळी पडलो असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून संबंधित सोशल मीडिया खाती, मोबाईल क्रमांक आणि बँक व्यवहारांच्या आधारे तपास सुरू केला आहे.