फिरायला नेण्याच्या बहाण्याने तरुणीचे अपहरण; धमकी देत आळंदीत जबरदस्तीने विवाह
पोलीस महानगर नेटवर्क
जालना : नात्यातील तरुणीला फिरायला नेण्याचे आमिष दाखवून चारचाकी वाहनातून पळवून नेत आळंदी येथे तिच्या इच्छेविरुद्ध धमकी देत जबरदस्तीने विवाह लावल्याची धक्कादायक घटना अंबड तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून चार जणांविरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जानेवारी रोजी सकाळी शहागड बसस्थानकातून संबंधित तरुणीला चारचाकीत बसवण्यात आले. त्यानंतर तिला थेट आळंदी येथील मंदिरात नेण्यात आले. तेथे ‘लग्न केले नाही तर जिवे मारू,’ अशी धमकी देत तिच्यावर बळजबरीने विवाह करण्याचा दबाव टाकण्यात आला.
दुसऱ्या दिवशी घरी परतल्यानंतर तरुणीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांविरोधात अपहरण, धमकी आणि जबरदस्तीने विवाह लावल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.