अंधेरीत स्पोर्ट्स बाईक चोरट्यांचा पर्दाफाश; १८ लाखांच्या ९ दुचाकी जप्त, तिघांना अटक

Spread the love

अंधेरीत स्पोर्ट्स बाईक चोरट्यांचा पर्दाफाश; १८ लाखांच्या ९ दुचाकी जप्त, तिघांना अटक

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : अंधेरी परिसरात स्पोर्ट्स बाईक चोरी करणाऱ्या टोळीचा अंधेरी पोलिसांनी पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे १८ लाख रुपये किमतीच्या नऊ स्पोर्ट्स बाईक हस्तगत करण्यात आल्या असून, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि नवी मुंबईतील एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.

१३ जानेवारी २०२६ रोजी रात्री बीएमसी कार्यालयामागील परिसरातून रॉयल एन्फिल्ड क्लासिक ३५० दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार अंधेरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासादरम्यान अंधेरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपी संघर्षनगर, साकीनाका परिसरातील असल्याचे निष्पन्न केले.

आरोपी रात्रीच्या वेळी घराबाहेर राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन ते तीन दिवस सापळा रचून ओमकार फासगे (२२), सागर गायकवाड (१९) आणि कार्तिक म्हस्के (१८) या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून स्पोर्ट्स बाईक चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपींकडून रॉयल एन्फिल्ड क्लासिक ३५०, यामाहा एमटी-१५, केटीएम ड्युक, पल्सर एनएस ४०० तसेच यामाहा आरएक्स १०० अशा एकूण नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या. या दुचाकी अंधेरी, विलेपार्ले, अँटॉप हिल, भांडुप, काळाचौकी, घाटकोपर, खारघर आणि परळ येथून चोरीस गेल्या होत्या.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर आणि गुन्हे निरीक्षक विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon