बदलापूरमध्ये सत्ताधाऱ्यांमधील वाद विकोपाला; शिंदे गटाच्या नगरसेवकाला भाजप पदाधिकाऱ्याकडून बेदम मारहाण
योगेश पांडे / वार्ताहर
बदलापूर – राज्यात आणि केंद्रात एकत्र सत्तेत असलेले शिवसेना शिंदे गट आणि भाजप बदलापूर शहरात मात्र आमनेसामने उभे ठाकल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. बदलापुरातील सोनिवली परिसरात शिवसेना शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक हेमंत चतुरे यांना भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
सोनिवली भागातील आत्मिया हाईड्स सोसायटीमध्ये माघी गणपतीच्या दर्शनासाठी शिवसेना शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक हेमंत चतुरे हे आले होते. यावेळी अचानक भाजप पदाधिकारी तेजस मस्कर आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी चतुरे यांना अडवून वाद घातला. पाहता पाहता हा वाद हाणामारीत रूपांतरित झाला, आणि चतुरे यांना बेदम मारहाण करण्यात आली.या मारहाणीचा सगळा प्रकार सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाला आहे. या फुटेजमुळे शहरातील राजकीय वातावरण आणखी तापलं असून, सोशल मीडियावरही या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.
मारहाणीत जखमी झालेले हेमंत चतुरे हे शिवसेना शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत चतुरे यांचा भाजपच्या उमेदवारासमोर पराभव झाला होता. मात्र, त्यानंतरही शिवसेना शिंदे गटाने त्यांना स्वीकृत नगरसेवक पद दिल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आणि जळफळाट निर्माण झाला होता. या जळफळाटातूनच ही मारहाण करण्यात आली, असा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी संजय जाधव यांनी केला आहे.या मारहाणीत हेमंत चतुरे हे जखमी झाले असून, बदलापूरमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली.
राज्यात आणि केंद्रात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप एकत्र सत्तेत असतानाही, बदलापूर शहरात मात्र दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकमेकांचे कट्टर वैरी असल्याचं चित्र सातत्याने समोर येत आहे. यापूर्वीही दोन्ही पक्षांमध्ये वाद, आरोप-प्रत्यारोप आणि संघर्षाच्या घटना घडल्या असून, ताजी मारहाणीची घटना त्याचाच पुढचा भाग मानली जात आहे. या प्रकरणात पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून, पुढील कारवाईकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे.