PIT-NDPS अंतर्गत ड्रग्ज तस्करावर कारवाई; नियाज शब्बीर खान नागपूर कारागृहात स्थानबद्ध
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : बृहन्मुंबईतील अंमली पदार्थ तस्करीविरोधातील कारवाईला आणखी एक मोठे यश मिळाले असून, अंमली पदार्थ विरोधी कक्षाने PIT-NDPS कायद्यान्वये सराईत ड्रग्ज तस्कर नियाज शब्बीर खान (वय ३९) याला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. जामिनावर मुक्त असूनही तो पुन्हा अंमली पदार्थांच्या व्यवसायात सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही कठोर कारवाई करण्यात आली.
अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटने गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०/२०२५ अंतर्गत एम.डी. (मेफेड्रॉन) तस्करीप्रकरणी खान याला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध यापूर्वी एनडीपीएस कायद्यान्वये चार आणि भारतीय दंड विधानान्वये पाच असे एकूण नऊ गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या चार एनडीपीएस गुन्ह्यांपैकी तीन गुन्ह्यांत तो जामिनावर मुक्त होता. मात्र, जामिनावर सुटल्यानंतरही त्याने ड्रग्ज व्यवसाय सुरूच ठेवल्याचे निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या वतीने अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ विधिनिषिद्ध व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९८८ (PIT-NDPS) अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव गृह विभाग, महाराष्ट्र शासनाकडे सादर करण्यात आला होता. गृह विभागाने या प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर २२ जानेवारी २०२६ रोजी खान याला ताब्यात घेऊन नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले.
खान याच्याविरुद्ध वडाळा, शिवडी पोलीस ठाणे, सी.बी. कंट्रोल व अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या विविध युनिटमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये चोरी, फसवणूक, मारहाण, तसेच एनडीपीएस कायद्यांतर्गत अनेक प्रकरणांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लक्ष्मी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे उप आयुक्त नवनाथ ढवळे व सहाय्यक आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या नेतृत्वाखाली वरळी युनिटचे वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली.