मुंब्र्यातील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख अडचणीत; पोलिसांनी थेट बजावली नोटिस
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळालं, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांनी आपल्या पक्षाकडून तिकीट मिळालं नाही म्हणून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये सर्वात जास्त इनकमिंग या काळात दिसून आलं, दरम्यान भाजपसह जवळपास सर्व पक्षांनी आपल्या पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या अनेक इच्छुकांना ऐनवेळी तिकीट दिलं, त्यामुळे निष्ठावंतांची नाराजी देखील पहायला मिळाली. काही पक्षांना या काळात निष्ठावंतांच्या नाराजीचा देखील फटका बसला. मुंबईमध्ये एकीकडे भाजप शिवसेना शिंदे गट यांची युती महापालिका निवडणुकीच्या मैदानात होती, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची देखील युती पहायला मिळालं. दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे तीनही पक्ष एकत्र आल्यानं त्यांच्या पक्षातील अनेक इच्छुकांचा महापालिका निवडणुकीसाठी पत्ता कापला गेला होता.
यामध्येच एक नाव होतं ते म्हणजे सहर शेख यांचं सहर शेख यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिकीट मिळालं नाही, त्यानंतर त्यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला.मुंब्रा हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आव्हाड यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांना जबरदस्त हादरला देण्याचं काम सहर शेख यांनी केलं. सहर शेख विजयी झाल्यानंतर कैसा हाराया..? असं म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाडांना डिवचलं होतं, त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.
दरम्यान त्यानंतर त्यांनी एक मोठं विधान केलं होतं. मुंब्र्याला हिरवं करायचं आहे, अशा अशायाचं ते विधान होतं, आता त्यांच्या या वक्तव्यावरून त्या अडचणीत आल्या आहेत. पोलिसांनी सहर शेख आणि त्यांचे वडील युनिश शेख यांना नोटीस बजावली आहे. ज्यामुळे समाजात असंतोष निर्माण होईल, असं भाषण करू नये, असं या नोटीसमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच सोशल मीडियावर बोलताना देखील या पद्धतीचे वक्तव्य टाळा असंही पोलिसांनी म्हटलं आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६८ नुसार मुंब्रा पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.