नवी मुंबईत खळबळ; मुलाने वडिलांचे चार फ्लॅट्स परवानगीविनाच भाड्याने देऊन १७.४० लाखांची केली फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई / पनवेल — कष्टाने उभी केलेली मालमत्ता पोटच्या मुलानेच हडप केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला असून, या घटनेमुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. वडिलांच्या परवानगीशिवाय त्यांच्या मालकीचे चार निवासी फ्लॅट बनावट भाडेकरारांच्या आधारे भाड्याने देत तब्बल १७ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन पनवेल येथील रहिवासी प्रकाश त्रिंबक पाटील (वय ७१) हे सेवानिवृत्त आहेत. करंजाडे परिसरातील ‘टू डे ब्लीस’ आणि ‘सहारा संकल्प’ या इमारतींमध्ये त्यांच्या मालकीचे चार निवासी फ्लॅट आहेत. त्यांचा मुलगा प्रशांत प्रकाश पाटील (वय ४५) याने वडिलांची कोणतीही परवानगी न घेता या फ्लॅट्सचे बनावट भाडेकरार तयार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
आरोपीने भाडेकरारावर वडिलांचे फोटो लावून त्यांच्या खोट्या सह्या केल्या. वडिलांना कोणतीही माहिती न देता चारही फ्लॅट परस्पर भाड्याने देण्यात आले. भाडे व अनामत रक्कम मिळून १७ लाख ४० हजार रुपये आरोपीने स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी खर्च केल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकाराची माहिती मिळताच प्रकाश पाटील यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार, आरोपी प्रशांत पाटील याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 336, 338 तसेच भारतीय दंड संहिता कलम 420, 467, 468 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परिमंडळ-१ चे पोलीस उपआयुक्त यांच्या परवानगीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार पुढील तपास करीत आहेत.