नागपूरमधील राजनगर परिसरात वर्षाचा सर्वात मोठा दरोडा!

Spread the love

नागपूरमधील राजनगर परिसरात वर्षाचा सर्वात मोठा दरोडा!

२४७ तोळं सोनं, हिऱ्याचे हार अन् ६५ लाखांची कॅश असा एकूण ४ कोटींचा माल गायब

योगेश पांडे / वार्ताहर

नागपूर – नागपूरमधून एक चोरीची मोठी घटना घडली आहे. एका व्यावसायिकाच्या घराची रेकी करून चोरांनी घरातून तब्बल २४७ तोळं सोनं आणि ६५ लाख रोकड असा ४ कोटींचा मुद्देमाल लंपास केला आहे. एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी ही चोरी केली आहे. चोरांनी रेकी करून घरात दरोडा टाकल्याचं समोर आलं आहे. या चोरीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमधील राजनगर परिसरात ही घटना घडली आहे. या भागात राहणारे बलजींदर सिंह नय्यर हे व्यावसायिक आहेत. नय्यर यांच्या मुलाचे सोमवारी साक्षगंध असल्याने पूर्ण कुटुंबीय संध्याकाळी कळमेश्वर तालुक्यात गेलं होतं. नय्यर यांच्या बंगल्यात कुणी नसल्याचं पाहून चोरांनी दरोडा टाकला.

सोमवारी रात्री चोरांनी नय्यर यांच्या बंगल्यात प्रवेश केला.अज्ञात चोरट्याने स्वयंपाक घरातील खिडकीची लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लॉकरमधील २४७ तोळे सोन्याचे दागिने, हिऱ्याच्या दागिन्यांचे सेट चोरट्यानं लंपास केलं. चोर एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी सोन्याची नाणी, ब्रेसलेट, हार सुद्धा गायब केली. तसंच घरात असलेली तब्बल ६५ लाख रुपये रोख देखील चोरांच्या हाती लागले. चोरांनी सोनं आणि रोख रक्कम असा ४ कोटी रुपयांचा मला लंपास केला.

नय्यर कुटुंबीय रात्री ३ वाजताच्या सुमारास घरी परतले, घरात प्रवेश केल्यानंतर स्वयंपाक घराची खिडकी तुटल्याचं लक्षात आलं. घरात लॉकरकडे धाव घेतली असता एकच धक्का बसला. घरात घरफोडी झाल्याचा प्रकार लक्षात आला.

नय्यर यांनी तातडीने घटनेची माहिती सदर पोलीस स्टेशनला कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. नय्यर यांच्या घरातून २४७ तोळे सोन्याचे दागिने, ६५ लाख रोख चोरट्याने लंपास केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon