मंदिरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना अटक; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरीसह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिरांमध्ये सातत्याने चोऱ्या करून दहशत निर्माण करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. अक्षय अर्जुन मोरे (२८, रा. गोंदिलवाडी, ता. पलूस, जि. सांगली) आणि संभाजी राजाराम जाधव (३०, रा. विकास कारखान्याजवळ, पलूस, जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून सुमारे १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान दोघांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोऱ्या केल्याची तसेच सांगली शहरात घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. यामध्ये रत्नागिरी येथील श्रीराम मंदिरातील सीतामाईच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी प्रकरणाचाही समावेश आहे.
सांगली शहरातील राम मंदिराजवळील संजोग कॉलनीत राहणारे सम्राट विश्वनाथ माने (५३) यांच्या बंगल्यात २५ डिसेंबर २०२५ रोजी चोरी झाली होती. या प्रकरणी माने यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन व त्यांच्या पथकाला आरोपी चोरीचा माल विक्रीसाठी सांगलीवाडीतील फल्ले मंगल कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्यांच्या दुचाकीवरील गोणपाटात चांदी, तांबे व पितळेचे पूजेचे साहित्य आढळून आले. तसेच अक्षय मोरेच्या खिशात चार पदरी सोन्याचे मंगळसूत्र सापडले.
पोलिस तपासात असेही उघड झाले की, अक्षय मोरे याला यापूर्वी मिरज तालुक्यातील आरग येथील पद्मावती मंदिर चोरीप्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर त्याने संभाजी जाधवच्या मदतीने रत्नागिरी जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोऱ्या केल्या. २९ सप्टेंबर २०२५ रोजी रत्नागिरीतील श्रीराम मंदिरातील सीतामाईच्या गळ्यातील मंगळसूत्र व हार चोरी केल्याचे तसेच अर्जुनवाड येथील मंदिरातील गणेशमूर्ती चोरी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.