वर्ध्याच्या आर्वीत मनोरुग्णाचा थरार; भाजी मार्केटमध्ये दोन शेतकऱ्यांची हत्या

Spread the love

वर्ध्याच्या आर्वीत मनोरुग्णाचा थरार; भाजी मार्केटमध्ये दोन शेतकऱ्यांची हत्या

योगेश पांडे / वार्ताहर

वर्धा – वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात बुधवारी सकाळी घडलेल्या एका अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. शहरातील गजबजलेल्या इंदिरा भाजी मार्केट परिसरात एका माथेफिरू युवकाने केलेल्या अमानुष हल्ल्यात ७० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. जखमीपैंकी दुसऱ्या शेतकऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. भरदिवसा वर्दळ असलेल्या बाजारात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आर्वी येथील रहिवासी असलेला मथुरेश उर्फ मत्या लाडके (२२) हा युवक बुधवारी सकाळी अचानक नग्नावस्थेत इंदिरा भाजी मार्केटमध्ये दाखल झाला. त्याच्या हातात एक मोठी लाकडी काठी होती. सकाळच्या सुमारास भाजीपाला आणि शेतमाल विक्रीसाठी आलेले शेतकरी तसेच खरेदीसाठी आलेले नागरिक आपल्या दैनंदिन व्यवहारात व्यस्त असतानाच मथुरेशने अचानक धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली.

मथुरेशने सर्वप्रथम संजय रामकृष्ण राऊत (७०) या वृद्ध शेतकऱ्यावर लाकडी काठीने अमानुष हल्ला चढवला. डोक्यावर जोरदार प्रहार झाल्याने राऊत यांची कवटी फुटली असून, मेंदू बाहेर पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या भीषण हल्ल्यात राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. संजय राऊत हे शेतकरी असून ते आपल्या शेतमालाची विक्री करण्यासाठी नेहमीप्रमाणे बाजारात आले होते.यानंतर या माथेफिरू युवकाने तेथे उपस्थित असलेले रामराव महादेवराव वांगे (८५) आणि शहजाद या दोन शेतकऱ्यांवरही काठीने हल्ला केला. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन गंभीर जखमी शेतकऱ्यांपैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

भरबाजारात सुरू असलेला हा थरार पाहून विक्रेते, शेतकरी आणि ग्राहकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी आपली दुकाने आणि हातगाड्या तशाच टाकून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच आर्वी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने माथेफिरू मथुरेश लाडके याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे आर्वी शहरात संतापाची लाट उसळली असून बाजारपेठेतील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon