दादरचा गड जिंकताच यशवंत किल्लेदारांचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले, ‘मी तुमचं हृदय सांभाळलंय’
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निकालांमध्ये भाजप-शिवसेनेने बाजी मारत मुंबईतील ठाकरेंची २५ वर्षांची सत्ता उलथवून लावली. ठाकरे बंधूंनी मराठीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापवत भाजप आणि शिंदे गटासमोर मोठे आव्हान निर्माण केले होते. मात्र, भाजपने ८८ आणि शिवसेना २८ जागा जिंकत मुंबई महानगरपालिकेसाठी आवश्यक असलेल्या ११४ जागांचा आकडा गाठला आहे. ठाकरे बंधूंना मराठीबहुल भागांमध्ये भरभरुन मतदान झाले. यामध्ये दादरमधील वॉर्ड क्रमांक १९२ चा समावेश आहे. या जागेवर मनसेचे यशवंत किल्लेदार आणि शिंदे गटाच्या प्रिती पाटणकर यांच्यात लढाई होती. मात्र, यशवंत किल्लेदार यांनी या लढाईत बाजी मारली.
वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये विजयी झाल्यानंतर यशवंत किलेदार आणि त्यांचे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले. याठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला. यावेळी राज ठाकरे यांनी शिवतीर्थच्या बाल्कनीत येऊन मनसेच्या कार्यकर्त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. यशवंत किल्लेदार यांनी या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनाही फोन केला होता. ‘तुमचं दादर आम्ही सांभाळलं, तुमचं हृदय मी सांभाळलेलं आहे’, असे यशवंत किल्लेदार यांनी म्हटले. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, शिवसेना भवन आता तुझ्या प्रभागात आहे ते तुला सांभाळायचं आहे.
तर दादरमधील वॉर्ड क्रमांक १९० मध्ये अटीतटीच्या लढाईत भाजपच्या शीतल गंभीर यांनी ठाकरे गटाच्या वैशाली पाटणकर यांचा पराभव केला. याठिकाणी फेरमतमोजणी झाली. शेवटी शीतल गंभीर फक्त २१ मतांनी विजयी झाल्या. यानंतर शीतल गंभीर यांनी शिवसेना भवनासमोरुन विजयी मिरवणूक काढली.