शिंदेंच्या अंगणात ठाकरेंच्या उमेदवाराचा विजयी गुलाल; शहाजी खुपसे ठरला ठाण्याचा जाएंट किलर!
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेला जोरदार यश मिळालं आहे, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का लागला आहे. ठाणे महापालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व राहिलं असलं तरी एकनाथ शिंदेंच्या अंगणामध्येच त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. एकनाथ शिंदे राहतात त्याच वॉर्डमध्ये शिंदेंच्या शिवसेना उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला आहे.
एकनाथ शिंदे राहतात त्या वॉर्डमध्ये शिवसेनेने माजी महापौर अशोक वैती यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती, पण ठाकरे गटाचे शहाजी खुस्पे यांनी वैती यांचा पराभव केला. शहाजी खुपसे यांनी अशोक वैती यांचा ६६७ मतांनी पराभव केला आहे. प्रभाग क्रमांक १३ मधल्या ४ प्रभागांपैकी तीन जागांवर शिवसेनेचा विजय झाला, पण एका जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने गेम फिरवला.
प्रभाग क्रमांक १३ अ मध्ये शहाजी खुस्पे यांना १२,८६० मतं मिळाली तर शिवसेनेच्या अशोक वैती यांना १२,१९३ मतांवर समाधान मानावं लागलं. याशिवाय १३ ब मध्ये शिवसेनेच्या निर्मला कणसे यांनी शिवसेना उबाठा उमेदवार अनिता हिंगेंचा पराभव केला. १३ कमध्ये शिवसेना उबाठाच्या वैशाली घाटवळ यांच्याविरोधात वर्षा शेलार यांनी विजय मिळवला. १३ ड मध्ये शिवसेनेच्या अनिल भोर यांनी शिवसेना उबाठाच्या संजय दळवी यांना पराभवाची धूळ चारली.