शरद पवारांसाठी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा मोठा निर्णय; राज्यसभा निवडणुकीचा सस्पेन्स लवकरच संपणार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात राज्यसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून, महाविकास आघाडीतील (मविआ) एका जागेवरून सुरू असलेला सस्पेन्स आता संपण्याच्या मार्गावर आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर मविआतील तिन्ही प्रमुख पक्षांचे जवळपास एकमत झाले आहे. शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने आघाडीतील हालचालींना वेग आला आहे.
राज्यसभेच्या या जागेसाठी महाविकास आघाडीत गेल्या दोन आठवड्यांपासून रस्सीखेच सुरू होती. मात्र, शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर समीकरणे बदलल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे नेते जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे.
इतकेच नव्हे तर या विषयावर दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशीही संवाद साधण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने शरद पवार यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला, तर उद्धव ठाकरे यांनीही त्यांना संपूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्यासारखा अनुभवी आणि ज्येष्ठ नेता संसदेत असणे हे राज्याच्या तसेच आघाडीच्या हिताचे असल्याचे मत मविआतील नेत्यांमध्ये व्यक्त होत आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्ष आपापले उमेदवार निश्चित करण्यात व्यस्त असताना, महाविकास आघाडीने शरद पवार यांच्या नावावर एकमत केल्याने आघाडीतील अंतर्गत मतभेद मिटल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या १६ मार्च रोजी मतदान होणार असून, महाराष्ट्रातील सात जागांपैकी संख्याबळानुसार मविआला एक जागा मिळणे अपेक्षित आहे.
गेल्या अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणात सक्रिय असलेल्या शरद पवार यांचा सध्याचा राज्यसभेतील कार्यकाळ एप्रिल २०२६ मध्ये संपत आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ आघाडीला मिळावा, या उद्देशाने त्यांना पुन्हा संधी देण्याची तयारी असल्याचे चित्र आहे. आता या निर्णयाची अधिकृत घोषणा कधी होते, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.