कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या चार गोवंशांची सुटका
महाड एमआयडीसी पोलिसांची कारवाई; तीन आरोपींविरोधात गुन्हा, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
महाड : कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या गोरेगावकडे नेल्या जात असलेल्या चार गोवंशांची महाड एमआयडीसी पोलिसांनी वेळेवर कारवाई करत सुटका केली. या प्रकरणी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बोलेरो पिकअप वाहनासह सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शुक्रवारी (१६ जानेवारी) पहाटे ५.४५ ते ६.०० या वेळेत मौजे नागलवाडी गावच्या हद्दीत मुंबई–गोवा महामार्गावरील सावित्री नदी पुलावर ही कारवाई करण्यात आली. महाड एमआयडीसी पोलिसांनी महिंद्रा बोलेरो पिकअप (क्रमांक MH-06 BW-9355) थांबवून तपासणी केली असता, वाहनात दोन तांबड्या व दोन पांढऱ्या गायी दाटीवाटीने व क्रूर पद्धतीने बांधून नेल्या जात असल्याचे आढळून आले. या गायींची अंदाजे किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे.
तपासात आरोपींकडे गोवंश वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे, तसेच चारापाणी, खेळती हवा, वैद्यकीय तपासणी व प्राथमिक उपचाराचे साहित्य उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. कत्तलीसाठी गोरेगाव (माणगाव) येथील एका अज्ञात व्यक्तीकडे ही वाहतूक केली जात असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी असलम अब्दुल पेवेकर (वय ५०, रा. वरंध मोहल्ला, महाड), संतोष गंगाराम तांबे आणि एका अज्ञात आरोपीविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या चार गायी आणि बोलेरो पिकअप वाहन असा एकूण मुद्देमाल सुमारे १२ लाख रुपयांचा असून, पुढील तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.