दहावी पेपर घोटाळ्याचे धागेदोरे थेट आमदार–खासदारांपर्यंत; आरोपीसाठी लावला होता वशिला
योगेश पांडे / वार्ताहर
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे दहावीच्या उत्तरपत्रिकांमधील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांचे थेट लोकप्रतिनिधींशी संबंध असल्याचे समोर आले असून, त्यांना पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यासाठी शिफारस पत्रे देण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
२७ फेब्रुवारी २०२६ रोजी दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर संपल्यानंतर उपशिक्षणाधिकारी रजनी शिरभाते यांच्या पथकाने अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई विद्यालयाच्या कस्टडीला अचानक भेट दिली. तपासणीदरम्यान दोन उत्तरपत्रिका कमी असल्याचे आढळून आले. याच वेळी अनिल हाडोळे नावाचा व्यक्ती शर्टखाली कमरेत उत्तरपत्रिका लपवून आत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. पथकाच्या तत्परतेमुळे हा प्रकार वेळीच उघडकीस आला.
या प्रकरणी पोलिसांनी १ मार्च रोजी प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, खोडे व हाडोळे यांना अटक करण्यात आली आहे.
या घोटाळ्यातील आणखी गंभीर बाब म्हणजे, आरोपी सुधीर खोडे यांना गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार मिळावा यासाठी थेट राजकीय पातळीवरून शिफारस करण्यात आल्याचे समोर आले आहे. बळवंत वानखडे यांनी ३ मार्च २०२५ रोजी, तर गजानन लवटे यांनी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांना पत्र लिहून खोडे यांना पदभार देण्याची शिफारस केली होती. या पत्रांनंतरच खोडे यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आल्याची अधिकृत कागदपत्रे आता समोर आली आहेत.
सुधीर खोडे यांची मूळ नियुक्ती पंचायत समिती अमरावती येथे असताना त्यांना तब्बल ८१ किलोमीटर अंतरावरील अंजनगाव सुर्जीचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता. तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी या नियुक्तीला विरोध दर्शवत, अमरावतीहून अंजनगाव सुर्जीचे कामकाज पाहणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, या आक्षेपांकडे दुर्लक्ष करत राजकीय दबावाखाली ही नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणाची तक्रार पालकमंत्री कार्यालयाकडेही करण्यात आली होती. तरीही जिल्हा परिषद प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे. दहावीच्या पेपर घोटाळ्याचे धागेदोरे थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचल्याने, आता पोलिसांकडून या दिशेने सखोल तपास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.