मुंबईत कडेकोट बंदोबस्त; ३०००० पोलीस तैनात; एसआरपीएफ, क्यूआरटीच्या अतिरिक्त तुकड्या सज्ज
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुंबई पोलीसांनी जय्यत तयारी केली आहे. संपूर्ण मुंबईत तब्बल ३०००० पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून, राज्य राखीव पोलीस दल (SRPF), दंगल नियंत्रण पथक (QRT) यांच्यासह इतर विशेष तुकड्यांचीही अतिरिक्त कुमक मैदानात उतरवण्यात येणार आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यंदाच्या निवडणुकीत धार्मिक अथवा अन्य संवेदनशील मुद्द्यांवर आधारित अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची संख्या तुलनेने कमी आहे. मात्र, तरीही कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खुल्या आणि गर्दीच्या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्याचे स्पष्ट आदेश सर्व विभागांना देण्यात आले आहेत.
शहरातील प्रत्येक प्रभागात पोलीस, अधिकारी आणि विशेष पथके तैनात करण्यात येणार असून, मतदान केंद्रांच्या परिसरात गस्त वाढवण्यात येणार आहे. संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे आणि मोबाइल पथकांची मदत घेतली जाणार आहे. तसेच, मतदान प्रक्रियेदरम्यान अफवा पसरू नयेत किंवा अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी सोशल मीडियावरही स्वतंत्र पथक लक्ष ठेवणार आहे.
कोणत्याही प्रकारे शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पोलीसांनी दिला आहे. दारूबंदी आदेश, जमावबंदी आणि शस्त्रबंदी आदेशांची कडक अंमलबजावणी केली जाणार असून, संशयित गुन्हेगारांवर आधीच प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मुंबई पोलीसांनी नागरिकांना निर्भय वातावरणात मतदान करण्याचे आवाहन केले असून, कोणतीही अडचण किंवा संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.