ऐरोलीतील माजी नगरसेवक एम. के. मढवी रबाळे पोलिसांच्या ताब्यात; पोलिसांशी हुज्जत घातल्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई : ऐरोली येथील माजी नगरसेवक एम. के. मढवी यांनी एका मंडळातील तरुणांना मारहाण केल्याचा आरोप समोर आल्यानंतर रबाळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात मढवी यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐरोली परिसरातील एका सार्वजनिक मंडळात झालेल्या वादानंतर माजी नगरसेवक एम. के. मढवी यांनी काही तरुणांना मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे रबाळे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिस ठाण्यात चौकशीदरम्यान मढवी यांनी पोलिस कर्मचाऱ्यांशी वाद घालत हुज्जत घातल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात तसेच नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
या प्रकरणी रबाळे पोलीस पुढील तपास करत असून, तरुणांच्या मारहाणीच्या आरोपासह पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.