हिवाळ्यातील मूक जीवांसाठी करुणेचा हात; उम्मेद फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ ठाणे यांचा संयुक्त अन्नदान उपक्रम

ठाणे : हिवाळ्याच्या दिवसांत वाढणारी थंडी आणि अन्नाची टंचाई लक्षात घेता भटकी व सामुदायिक प्राण्यांसाठी अन्नाची गरज अधिक तीव्रतेने जाणवते. ही बाब ध्यानात घेऊन उम्मेद फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरंग सोसायटी, शिवसेना शाखा परिसरात भटक्या व सामुदायिक प्राण्यांसाठी अन्नदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचे नेतृत्व उम्मेद फाउंडेशनच्या संस्थापक परी मेहता यांनी केले. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये अंजना शर्मा, अर्चिता मिश्रा तसेच रोटरी क्लब ऑफ ठाण्याच्या अध्यक्षा चांदनी आणि त्यांच्या टीमने सक्रिय सहभाग नोंदवला. भटकी व सामुदायिक प्राणी हिवाळ्यात अन्नाअभावी अधिक त्रस्त होतात; अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी नियमित अन्नपुरवठा व आरोग्यसेवा देणाऱ्या प्राणीप्रेमी व अॅनिमल फीडर्सच्या कार्याला पाठबळ देण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या शिबिरात १०० हून अधिक कुत्र्यांसाठी अन्नसाहित्य वितरित करण्यात आले. यामध्ये भात, पेडिग्री, मांजरांसाठी अन्न व कॅट पर्क यांचा समावेश होता. तसेच डिवॉर्मिंग गोळ्या, मेडिकल किट, हातमोजे, कापूस व आवश्यक औषधे श्रीरंग सोसायटी, वृंदावन, राबोडी आणि आनंदपार परिसरातील प्राणी फीडर्सना देण्यात आली. भटक्या व सामुदायिक प्राण्यांची संख्या अधिक असलेल्या या भागात हा उपक्रम विशेष उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी तेजस उमटकर (शाखा प्रमुख) आणि अमित जेसवाल (विभाग प्रमुख) यांचे विशेष सहकार्य लाभले. या संयुक्त उपक्रमातून करुणा, जबाबदारी आणि सहअस्तित्वाचा संदेश समाजात पोहोचवण्यात आला असून, भविष्यातही मूक प्राण्यांसाठी अशाच उपक्रमांच्या माध्यमातून कार्य करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.