३५ रुपयांच्या वादातून मित्राच्या काकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न; जोगेश्वरीतील पानटपरीवरील थरारक घटना
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : सिगरेटचे अवघे ३५ रुपये देण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून अमानुष हिंसाचार घडल्याची धक्कादायक घटना मुंबईतील जोगेश्वरी परिसरात उघडकीस आली आहे. वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या मित्राच्या काकांवरच पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी नागेंद्र यादव (वय २२) याला अटक केली आहे.
जोगेश्वरीतील एका पानटपरीवर नागेंद्र यादव आणि त्याच्या मित्रामध्ये सिगरेटच्या पैशांवरून वाद झाला. वाद वाढू नये म्हणून मित्राचे काका राजेंद्र यादव हे दोघांना समजावण्यास पुढे आले. मात्र, याच रागातून नागेंद्र यादवने राजेंद्र यादव यांच्यावर पेट्रोल टाकून आग लावली. या घटनेत राजेंद्र यादव गंभीर भाजले गेले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संपूर्ण प्रकार पानटपरीवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. किरकोळ कारणावरून घडलेल्या या क्रूर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.