मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल उशिरा लागणार; उमेदवारांची धाकधूक वाढली
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. मात्र, यंदाच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने स्वीकारलेल्या ‘टप्प्याटप्प्याने मतमोजणी’ या पद्धतीवर राजकीय नेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. यामुळे निकालाला विलंब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी आज मतदान पार पडल्यानंतर उद्या १६ जानेवारीला होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाने विशेष नियमावली जाहीर केली आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी माहिती दिली की, प्रत्येक केंद्रावर एकावेळी केवळ दोनच ‘प्रभागांची’ मतमोजणी केली जाईल. हे प्रभाग पूर्ण झाल्यानंतरच पुढील प्रभागांची मोजणी सुरू होईल. प्रशासनाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात संभ्रमाचे आणि नाराजीचे वातावरण आहे.
या नव्या पद्धतीमुळे निकालाचा कल समजण्यास उशीर होईल, असा दावा नेत्यांनी केला आहे. दादरच्या शिवाजी पार्क परिसरातून निवडणूक लढवणाऱ्या विशाखा राऊत म्हणाल्या की, माझा वॉर्ड क्रमांक १९१ हा शेवटचा आहे. अशा पद्धतीमुळे आम्हाला निकालासाठी शेवटपर्यंत ताटकळत राहावे लागेल. पूर्वीप्रमाणे एकाच वेळी सर्व प्रभागांची मोजणी करणे अधिक सोयीचे ठरले असते.
मुंबईतील २३ विविध कार्यालयांमध्ये मतमोजणी पार पडेल. मतदानानंतर सर्व EVM मशीन विक्रोळी आणि कांदिवली येथील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. जर कंट्रोल युनिटमध्ये तांत्रिक बिघाड झाला, तर यंदा प्रथमच PADU यंत्राचा वापर केला जाईल.एका वेळी दोनच प्रभागांची मोजणी होणार असल्याने, संपूर्ण २२७ जागांचे निकाल हाती येण्यासाठी किमान ८ ते १० तास लागण्याची शक्यता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे मुंबईचा नवा ‘महापौर’ कोणत्या पक्षाचा असेल, हे स्पष्ट होण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळ उजाडू शकते.